अन्नदात्याला बॉलीवूडकरांचा पाठींबा; रितेश ने दिला ‘जय किसान’चा नारा

बॉलीवूडकरांचा पाठींबा तर मराठी कलाकार मात्र उदासीन

टीम महाराष्ट्र देशा- विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघालेला किसान सभेचा मोर्चा आज मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला. या मोर्चाला अभूतपूर्व पाठिंबा मिळत असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेसह सर्व राजकीय पक्षही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सेलिब्रिटीसुद्धा मागे राहिले नाहीत. कलाविश्वातूनही या मोर्चाला पाठिंबा देण्यात येत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत मराठीचं प्रतिनिधीत्त्व करणारा अभिनेता रितेश देशमुख तसेच अभिनेत्री हुमा कुरेशीनेही शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण मोर्चाचे समर्थन करत ट्विट केले आहे.

रितेशने ट्विट करत या मोर्चाचं समर्थन करत ‘जय किसान’ असा नाराही दिला आहे.‘जवळपास ५० हजार शेतकरी त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून १८० किलोमीटरचा पायी प्रवास करुन इथे आले आहेत. या मोर्चाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी फक्त आणि फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये कोणतीही अडचणीची परिस्थिती उदभवू नये याची काळजी घेत रात्रीच आपला प्रवास केला. त्यांच्या या वृत्तीला आणि भूमिकेला माझा सलाम…’असं रितेशने म्हटलं आहे.

हुमाने शेतकरी मोर्चाचा फोटो शेअर करत तिने ट्विटमध्ये लिहिले की, ‘या शांततापूर्ण आंदोलनाला आपलाही पाठिंबा दर्शवूया. क्षुल्लक राजकारणाला बाजूला ठेवूया. यावर तोडगा काय आहे, याचा विचार करूयात.’

शेतकऱ्यांच्या या भव्य मोर्चानेच सध्या अनेकांचं लक्ष वेधलं आहे. एकिकडे हुमा कुरेशी आणि रितेश देशमुख या कलाकारांनी शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. पण, या साऱ्यात मराठी कलाविश्वातून अजूनही सेलिब्रिटी याविषयी पुढे येऊन भूमिका स्पष्ट करतांना दिसत नसून काही मोजक्याच कलाकारांनी शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चला ट्विटरच्या माध्यमातून पाठींबा दर्शविला आहे.

पहा काय म्हणतात मराठी कलाकार

You might also like
Comments
Loading...