BMC साठी दोन आयुक्त हवेच; मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टोक्तीनंतरही अस्लम शेख आपल्या विधानावर ठाम

Aslam_Shaikh_

मुंबई:- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप वर्षभराचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

राजकीय पक्षांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कंबर कसल्याने राजकीय वातावरण देखील तापत आहे. अशातच काँग्रेसचे नेते व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दोन महापालिका आयुक्तांच्या नेमणुकीची मागणी केली आहे.

पालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरिकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात. शिवाय मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते. नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन महापालिका आयुक्त असणं गरजेचं आहे, अशी मागणी अस्लम शेख यांनी केली आहे.

दरम्यान, अस्लम शेख यांच्या मागणीला शिवसेना, काँग्रेस पक्षातूनच विरोध केला गेला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील ह्या मागणीला विरोध दर्शवला होता. पण मुंबई महानगरपालिकेत दोन आयुक्त ठेवावे, हिच माझी मागणी आहे आणि मी यावर ठाम आहे, असे काँग्रेस नेते आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पुन्हा एकदा हे स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत एकच आयुक्त असेल, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतरही अस्लम शेख यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित करत मागणीवर ठाम असल्याचं म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या