राज ठाकरेंनी संजय तुर्डेची घेतली भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात जाऊन पक्षाचे विजयी उमेदवार संजय तुरडे यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी गंभीर जखमी असलेल्या संजय तुरडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुंबई महानगरपालिकेचा निकाल हाती येताच भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी कुर्ल्यात पाहायला मिळाली. कुर्ला येथून निवडून आलेले मनसेचे उमेदवार संजय रामचंद्र तुरडे यांच्यावर भाजपच्या ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला.

संजय तुरडे हे कुर्ला बैलबाजार वॉर्ड क्रमांक १६६ मधून निवडणुकीला उभे होते. गुरुवारी महापालिकेचे निकाल लागले. त्यात भाजप उमेदवारा सुधीर खातू यांचा पराभव करत ५९०८ मते मिळवून तुरडे विजयी झाले. मात्र तुरडे यांचा विजयाने भाजपच्या कार्यकर्त्यांचा पारा अनावर झाला. भाजपचे पराभूत उमेदवार सुधीर खातू व भाजपच्या ३०० ते ४०० कार्यकर्त्यांनी धारदार शस्त्रासह प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उशिरा घडला. भाजपचे कार्यकर्ते सुधीर काटू, किरण पवार, सचिन कानडे, नितीन कानडे, कुणाल कानडे, विजय कानडे, दिपू सिंग, शाम खाटू, सुनील माटुगडे, संजय पवा आणि हेमंत पवार यांच्यासह इतर २० ते २५ कार्यकर्त्यांनी बैलबाजार येथील लक्ष्मीनिवास समोरील मंडपात येऊन लोखंडी सळ्या, पेव्हर ब्लॉक आणि काठ्यांनी तुरडे यांना बेदम मारहाण केली.

त्यानंतर तलवार काढून तुरडे यांच्यावर सपासप वार केले. त्यात मनसेचे दहा ते १२ कार्यकर्तेही गंभीर जखमी झाले असून संजय तरडे यांची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यात तुरडे यांच्या डाव्या पायाला व गुडघ्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना कुर्ला बैलबाजार येथील आगाशे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास करत आहेत.