भाजप काँग्रेससोबत जाणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्या लोकांना काँग्रेससोबत जायचे आहे त्यांनी जावे भारतीय जनता पक्ष मात्र काँग्रेसची मदत कधीही घेणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

नगरपालिकांच्या निवडणुकानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत क्रमांक एकचा पक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आज भाजपनं मुंबईत सेलिब्रेशन केलं. त्यावेळी आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

भारतीय जनता पक्षावर सर्वांनीच विश्वास दाखवला आहे. काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली होती. काँग्रेस हा अतिशय भ्रष्ट पक्ष आहे. त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही असे ते म्हणाले. ज्यांना काँग्रेससोबत जाण्याची इच्छा आहे त्यांनी जरूर जावे असा टोला त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला. आपण काँग्रेससोबत जाणार नाही, नाही, नाही म्हणजे नाही असे ते यावेळी म्हणाले. निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.