बीएमसीने माझ्याशी भेदभाव केला; उच्च न्यायालयात सोनू सूदने केला आरोप

sonu sood

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत नंतर आता अनधिकृत बांधकाम प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद विरोधात बृहन्मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेता सोनू सूद विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे

जुहू येथील एबी नायर रोडवरील शक्ती सागर बिल्डींगचे रुपांतर आवश्यक त्या परवानग्या न घेता केल्यामुळे पालिकेने जुहू पोलीस ठाण्यात सूद विरोधात तक्रार केली आहे. आवश्यक परवानगी न घेता निवासी इमारतीचा व्यावसायिक वापरासाठी बदल केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

सोनू सूदने या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पालिकेला निर्देश दिले आहेत. दिवाणी न्यायालयानं सोनू सूदला दिलासा देत दिलेले निर्देश पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवले आहेत.

दरम्यान, बीएमसीने आपल्याशी भेदभाव केल्याचा आरोप सोनू सूद याने केला आहे. ‘शक्तीसागर इमारत ही १९९२पासून उभी असून ती बेकायदा नाही. मी ही इमारत २०१८-१९मध्ये घेतली होती. तशी कागदपत्रेही आहेत. ही इमारत आहे तशीच आहे आणि त्यातली एक खिडकी सुद्धा १९९२पासून तोडण्यात आलेली नाही,’ असा खुलासा सोनू सूदतर्फे न्यायालयात करण्यात आला आहे.

‘महापालिकेने एमआरटीपी कायद्याच्या कलम ५३ अन्वये नोटीस बजावताना त्यात कथित अनधिकृत बांधकामाचा कोणताच तपशील दिला नाही, अगदी अस्पष्ट स्वरूपाची नोटीस दिली. तरीही मी माझ्याकडील कागदपत्रे देऊन उत्तर दिले. नोटीस बजावताना आवश्यक मुदत आणि सर्व तपशील दिला जातो, मात्र माझ्याच बाबतीत पालिकेने भेदभाव केला असून काही तपशीलच दिला नाही,’ असा आरोप न्यायालयात सोनू सूदचे वकिल अमोघ सिंग यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या