ओबीसी आरक्षणासाठी सरकारला धक्का; राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्याने दिला राजीनामा

obc

नागपूर : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेल्याची टीका भाजप नेते करत आहेत. येत्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला मोठा धक्का बसणार असून याला आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल करत भाजपने आंदोलन देखील केले.

अशातच, राज्य मागासवर्ग आयोगाच्या एका सदस्याने दोन दिवसांपूर्वी तीव्र नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. ‘पदावर राहून जर मला माझ्या ओबीसी समाजाला न्याय आरक्षण मिळवून देता येत नसेल तर पदावर राहण्यात उपयोग काय?’ असा उद्विग्न सवाल करत राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिल्यामुळे खळबळ उडाली होती.

आता तायवाडे यांनी महाविकास आघाडी सरकारनं नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्याने राजीनामा दिल्याने मोठा धक्का मानला जात आहे. आज तायवाडे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे. याबाबत स्वतः तायवाडे यांनी नागपुरात माहिती दिली.

‘ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देता यावं यासाठी आपण ओबीसी महासंघाच्या वतीने काम केलं. मात्र आता सर्वोच न्यायालयाच्या निकालानंतर ओबीसी समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. त्यामुळे मी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचं तायवाडे यांनी सांगितलं. आपण राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे. आता आम्ही राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आणि मागणी पूर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलन करणार,’ असा इशारा देखील बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या