‘स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’त शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या, याला ‘रक्त महोत्सव’ म्हणायचं का?’

‘स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’त शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या, याला ‘रक्त महोत्सव’ म्हणायचं का?’

मुंबई :लखीमपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर तसेच केंद्रावर टीकास्त्रांचा प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. या हिंसाचार प्रकरणी शेतकऱ्यांना भेटायला जात असणाऱ्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आणि बुधवारी सामनामधून आपली भूमिका मांडत पुन्हा एकदा भाजपवर शरसंधाण साधलं आहे. प्रियांका गांधींबाबत राऊतांनी आपली भूमिका मांडली आहे.

प्रियांका गांधी यांची लढाई शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीच सुरू आहे. त्यांना अटक करुन त्यांचा आवाज आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दडपून टाकता येईल, असे सरकारला वाटत असेल तर तो भ्रम आहे. शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचा व्हिडीओच समोर आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का? हे काय सुरू आहे आपल्या देशात?, अशा संतप्त भावना आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.

सर्व सरकारी संपत्ती खासगी लोकांना विकून टाकल्यावर आता शेतजमिनींचा लिलाव सुरू झाला आहे . त्या मनमानीविरोधात शेतकरी उभा ठाकला आहे. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे ऐकायला हवे. प्रियंका गांधी यांची लढाई शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीच सुरू आहे. त्यांना अटक करून त्यांचा आवाज आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दडपून टाकता येईल, असे सरकारला वाटत असेल तर तो भ्रम आहे. नव्या ईस्ट इंडिया कंपनीकडे देश सोपवला जाऊ नये यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!, असंही संजय राऊत सामनामध्ये म्हणाले आहेत.

प्रियंका गांधी या काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर राजकीय हल्ले होऊ शकतात, पण देशासाठी असीम त्याग करणाऱ्या व पाकिस्तानचे तुकडे करून हिंदुस्थानच्या फाळणीचा सूड घेणाऱ्या महान इंदिरा गांधींच्या त्या ‘नात’ आहेत, यांचे तरी भान प्रियंकांना बेकायदेशीरपणे कैद करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते. कैदखान्यातून प्रियंका गांधींनी मोदी सरकारला जळजळीत प्रश्न विचारला आहे, ”माझा अपराध काय? कोणत्याही वॉरंटशिवाय, एफआयआरशिवाय मला डांबून का ठेवले? शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे काय?” प्रियंका गांधी या लखीमपूर खेरीत सर्वप्रथम पोहोचल्या, असं राऊतांनी सामनामधून सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या