तुमच्या लेकाला आशीर्वाद द्या, धनंजय मुंडेंची परळीकरांना भावनिक साद

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर नेते आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा परळी येथे आली असता धनंजय मुंडे यांनी तुमच्या लेकाला आशीर्वाद द्या अशी भावनिक साद परळीकरांना घातली.

धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात ‘आजही आमचा मतदारसंघ दुष्काळात होरपळतोय, त्यामुळे शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत उत्सवात कसे करावे हा प्रश्न पडला. मात्र उत्सवात स्वागत न करता उत्साहात स्वागत केलं गेलंय. मागील दहा वर्षाच्या सत्तेत परळीकरांना काय मिळाले हा प्रश्न आहे. मागील पाच वर्षाच्या सत्तेत जायकवाडीचे पाणी वाण धरणात आणता आले नाही ना वाण धरणाची उंची वाढवता आली. परळी शहरात आठ महिन्यापासून नगरपालिकेच्या वतीने टँकरने पाणी पोहचवले जाते असं विधान केले.

तसेच आपल्या इथे MIDC होऊ शकत असतानाही ती उभी करण्याचे समजले नाही. आमच्या ताईंच्या अनेक दिग्गज उद्योगपतींशी ओळखी आहेत. पण तरीदेखील आपल्या भागात उद्योग का आणता आला नाही. याउलट पवार साहेबांना विनंती केली तर झटक्यात सिमेंटची कंपनी आली अशी माहिती दिली.

पुढे बोलताना मी आपल्यासाठी जी सेवा मागील २४ वर्ष केली. त्याचे फळ मिळण्याची वेळ आज आली आहे. आता तुमच्या या लेकराला जिंकून आणण्याची जबाबदारी तुमची आहे. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत माझ्या भागातला माणूस हा आर्थिक दृष्ट्या मोठा व्हायला हवा हेच माझं स्वप्न आहे. मी तुम्हाला शब्द देतो की, तुमच्या लेकाला आशीर्वाद द्या… या भागाचा चेहरामोहरा पालटून टाकल्याशिवाय थांबणार नाही. यावेळी हा आशीर्वाद द्यायला आपण कमी पडणार नाही अशी आशा बाळगतो असं आवाहन उपस्थितांना केले.