शिवसेनेचा आमदार निशाण्यावर ? संशयित पार्सलवर शिवसेना आमदाराचे नाव

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकमध्ये हुब्बळी रेल्वे स्थानकावर स्फोट झाल्यानंतर त्यातल्या बादलीवरील पुठ्ठ्याच्या पत्र्यावर शिवसेनेच्या आमदाराचं नाव कसं आलं याचा तपास कोल्हापूर पोलिस करत आहेत. गेल्या आठवड्या मुंबई-बंगळुरु महामार्गावर एका ट्रकमध्ये झालेल्या स्फोटाचा संबंध हुब्बळी घटनेशी आहे का याचा तपास देखील पोलिस करत आहेत. हुब्बळी रेल्वे स्थानकावर एका बादलीमध्ये कमी तीव्रतेचा स्फोटक पदार्थ ठेवण्यात आला होता असं पोलिसांनी सांगितलं. स्फोटाच्या संशयित पार्सलवर कोल्हापुरातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांचं नाव आहे. आबिटकर हे राधानगरी मतदारसंघाचे आमदार आहेत.

हुबळी रेल्वे स्थानकावर काल झालेल्या स्फोटात हुसेनसाब नईवाले हा तरुण गंभीर जखमी झाला. स्टेशनवर आलेल्या एका पार्सलमधील संशयित वस्तूच्या माध्यमातून हा स्फोट झाला होता. अशा प्रकारचं पार्सल प्रकाश आबिटकर यांच्या नावे आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना आमदार निशाण्यावर होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूरनजीक असणाऱ्या उजळाईवाडी इथं चार दिवसापूर्वी गावठी हात बॉम्बचा स्फोट होऊन एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा छडा लावण्यास कोल्हापुरातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे.

हातकणंगले तालुक्यातील मालेमुडशिंगी इथं छापा घालून पोलिसांनी गावठी हात बॉम्ब बनवण्याचा कारखाना उघडकीला आणला असून, याप्रकरणी विलास आणि आनंदा राजाराम जाधव या दोघा बंधूंना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 69 गावठी हात बॉम्ब जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सातहजार रुपये इतकी आहे. हे गावठी हातबॉम्ब रानडुकराच्या शिकारीसाठी तयार करण्यात येत असल्याची कबूली जाधव बंधूंनी दिली आहे.ही माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख आणि पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महत्वाच्या बातम्या