बायोडिझेल विक्रीचा वर्षभरापासून काळाबाजार! हजारो लिटर डिझेलसह रोख जप्त ; एक फरार

औरंगाबाद : वाहनांमध्ये बायोडिझेलचा वर्षभरापासून बिनबोभाटपणे काळाबाजार करणा-या सात जणांना पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने पकडले. ही कारवाई गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास नारेगावातील हिनानगरात करण्यात आली. या कारवाईत तीन लाख २७ हजार ६० रुपये रोख, ड्रममधून दोन हजार ६०७ लिटर व टँकरमधून नऊ हजार ४४० लिटर असे बारा हजार ५४७ लिटर बायोडिझेल तसेच दोन क्रुझर, दोन टेम्पो, एक टँकर जप्त करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने बायोडिझेल (बी-१००) विक्रीला परवानगी दिल्याची संधी साधून बायोडिझेलच्या नावाने विविध इंधन भेसळ करुन कमी दरात बायोडिझेल विक्रीचा नवा गोरखधंदा फोफावत असल्याचे राज्यात दिसून येत आहे. डिझेलपेक्षा वीस ते पंचवीस रुपये बायोडिझेल स्वस्त मिळत असल्यामुळे अनेक वाहनधारक या इंधनाचा वापर करत आहेत. प्रत्यक्षात फक्त बायोडिझेलवर वाहन धावू शकत नसल्यामुळे या डिझेलमध्ये कशाची भेसळ होते. हे अद्यापही समोर आलेले नाही. हा काळाबाजार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे इंधनापोटी मिळणा-या कोट्यावधीच्या महसूलावर शासनाला पाणी फेरावे लागत आहे. दरम्यान, औरंगाबादेत बायोडिझेलसाठी अद्याप एकही पंप कार्यान्वित नाही. त्याचाच गैरफायदा घेऊन अवैधरित्या बायोडिझेल काळ्या बाजारात विकणा-या टोळीला पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, राजकीय वर्तुळातील मुख्य सूत्रधाराविरुध्द पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे, पोलीस नाईक एस. जे. सय्यद, इम्रान पठाण, ए. आर. खरात, एम. बी. विखणकर, व्हि. आर. निकम, व्हि. जे. आढे, व्हि. एस. पवार, सोनाली अकोलकर आणि शितल मुठे, अनुसया ढाकरे यांनी अन्न धान्य वितरण विभागाच्या पुरवठा निरीक्षक कविता वसंत गिराणे यांच्यासह नारेगावातील हिनानगरमधील गोदामावर छापा मारला. यावेळी के. के. ट्रेडर्सजवळील एका पत्र्याच्या शटरसमोर इरफान खमर खान (३५, रा. प्रगती कॉलनी) आणि जाहेद हमीद शेख (२९, रा. न्यू बायजीपुरा, गल्ली क्र. २९) हे वाहनांमध्ये अवैधरित्या बायोडिझेल भरत होते. त्यावरुन पोलिसांनी छापा मारत गोदामाची पाहणी केली. तेव्हा ड्रम, टाक्या आणि टँकरमध्ये असे एकुण बारा ५४७ लिटलर बायोडिझेल असल्याचे समोर आले.

तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली. यावेळी गोदामात असलेल्या चालक जयराम लिंबाजी चव्हाण (४५, रा. स्वराज्यनगर, बीड), शेख तखीयोद्दीन शेख अहेमद मोहीयोद्दीन (३४, रा. जुना बाजार, बीड), मोहसीन खान मोहम्मद खान (३०, रा. रोहीला गल्ली, जुना जालना), शाकेर खान इफ्तेखार खान (२६, रा. जुना जालना) आणि बाळासाहेब चिमाजी आहेर (३९, रा. पळसपुर, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशा सात जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक गिराणे यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या