fbpx

अमळनेरमध्ये मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे, पाणी प्रश्नावरून कार्यकर्ते आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आज अमळनेर तसेच रावेरमध्ये आयोजन करण्यात आलं आहे, सभा स्थळाकडे जाताना फडणवीस यांना पाडलसे धरण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आहेत. काळे झेंडे दाखवणाऱ्या ३७ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अमळनेरमधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळील मैदानात मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे, जळगाव मतदारसंघाचे उमेदवार उन्मेश पाटील यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे, काही दिवसांपूर्वीचं अमळनेर येथील सभेत राडा झाला होता. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार ड़ॉ. बी.एस. पाटील यांना बुटाने मारले होते.

दरम्यान, आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, तर सभेपूर्वी पाडलसे धरणाला निधी द्यावा, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.