fbpx

मोदींच्या सभेला नो ‘ब्लॅक’, काळ्या रुमालासह बनियान, सॉक्सदेखील काढायला लावले

अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदनगरमध्ये सभा घेत आघाडीवर तोफ डागली आहे, भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी या सभेच आयोजन करण्यात आले होते. नगर आणि शिर्डी मतदारसंघातील नागरिकांनी सभेला मोठी गर्दी केली होती. दरम्यान, सुरक्षेचं कारण देत सभेसाठी काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली होती, विशेष म्हणजे यावेळी काळ्या रुमालासह काळे बनियान, सॉक्स देखील काढल्यानंतरच मैदानात प्रवेश देण्यात आल्याचं समजतयंं.

भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई बनलेल्या अहमदनगर लोकसभेसाठी सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या सभेच आयोजन करत भाजपने नगरमधील वातावरण ढवळून टाकले आहे. मोदी मैदानावर येण्यापूर्वी पोलिसांकडून नागरिकांची तपासणी करण्यात येत होती. सभास्थळी काळ्या कपड्यावर बंदी घालण्यात आली.

नरेंद्र मोदींचा पवारांवर निशाणा

कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी फुटिरतावाद्यांशी हातमिळवणी केली आहे, आजवर अनेक वर्षापासून कॉंग्रेस हेच करत आलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा नाहीत, मात्र शरद पवारांचा राष्ट्रावाद कुठे गेला आहे. नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीच पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले का? असा सवाल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

खा गांधींचे भाषण मध्येच थांबवले, नाराज गांधीचे डोळे पाणावले

लोकसभेसाठी डावलण्यात आलेले विद्यमान खासदार दिलीप गांधी हे या सभेत भाषण करत असताना, त्यांना मध्येच थांबण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे भावनिक झालेल्या गांधींचे डोळे पाणावल्याचे चित्र पहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंचावर येण्यापूर्वी खा दिलीप गांधी भाषण करत होते, त्यांचे भाषण सुरु असतानाच जिल्हाध्यक्ष बेरड यांनी चिट्ठी देत भाषण थांबवण्यास सांगितले, भाषण थांबवण्यास सांगितल्यावर गांधी भडकले, भाषणात विखेंच नाव न घेता मतदारांना मतदान करण्याच आवाहन. तसेच विद्यमान खासदार असताना देखील बोलून न दिल्याने ते भावनिक झाले होते.