भाजपच्या ‘या’ मुख्य उमेदवाराचा उमेदवारी अर्ज धोक्यात, समर्थकांमध्ये अस्वस्थता

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. आज पासून उमेदवारी अर्ज छाननी सुरु झाली आहे. या छाननीमध्ये अनेक उमेदवारांचे अर्ज धोक्यात आले आहेत. त्यापैकीचं शिर्डी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे – पाटील यांचाही उमेदवारी अर्ज धोक्यात आला आहे. काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी विखेंच्या अर्जावर हरकत घेतली आहे. अर्ज भरताना राधाकृष्ण विखेंनी ज्या वकिलाकडून नोटरी केली आहे. त्या वकिलाला नोटरी करण्याचा अधिकारचं नसल्याचा दावा थोरात यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी राधा कृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, विखे यांनी दाखल केलेल्या अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. अर्ज दाखल करते वेळी नोटरी करून दिलेले प्रमाणपत्र हे ज्या वकिलांकडे बनवण्यात आलं, त्यांचा नोटरी करण्याचा परवाना 2016 मध्येच संपला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. याबाबत शिर्डी विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही दाखल झाली आहे.

विरोधकांच्या या हरकतीमुळे राधाकृष्ण विखे – पाटील यांचा अर्ज धोक्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघातील महत्वाचे उमेदवार आहेत. मात्र अर्ज धोक्यात आल्याने विखे पाटील समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या