महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपची रणनीती

टीम महाराष्ट्र देशा : राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्याने जिल्ह्यातही राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांवर आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी हे समीकरण जुळविण्यासाठी राजकीय नेत्यांनी आतापासून प्रयत्न सुरू केल्याचे चित्र आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपाने महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सध्या राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या आमदार राणाजगजितसिंह पाटील गटाचे वर्चस्व आहे. मात्र पक्ष बदलल्याने त्यांना आता सत्ता टिकविण्यासाठी राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना पक्षातील एखादा गट फोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नुकतेच राज्यात तिन्ही पक्षांनी मिळून सरकार स्थापन केल्याने जिल्ह्यातही ही महाविकास आघाडी सक्रिय होणार असे चित्र आहे. जिल्ह्यातील इतिहास लक्षात घेतला तर ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील व पुढे राणाजगजितसिंह पाटील यांच्याविरोधात सर्व पक्ष असे समीकरण जुळत होते.

आता राणाजगजितसिंह पाटील भाजपमध्ये गेल्याने भाजपाविरोधात तीन पक्ष, म्हणजे सध्याच्या स्थितीला विरोधकांसाठी अत्यंत सोयीचे समीकरण घडून आले आहे. सध्या जिल्हा परिषदेचे पक्षीय बलाबल पाहिले तर सर्वाधिक भाजपाकडे सदस्य आहेत. तसे असले तरी ते बहुमतापासून दूरच राहणार, असे चित्र आहे. साधारण आमदार पाटील यांच्या गटाचे 17 व भाजपाचे चार असे 21 सदस्यच त्यांच्याकडे असणार आहेत. गेल्यावेळी शिवसेनेचे दोन सदस्य फोडण्यात पाटील यांना यश मिळाले होते. ते सदस्य त्यांच्याकडे राहिल्यास बहुमतासाठी पाच सदस्यांची आवश्यकता भासणार आहे.  तर सदस्य महाविकास आघाडीकडे गेल्यास भाजपाला सात सदस्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

तर दुसरीकडे कॉंग्रेस 13, शिवसेना अकरावरून आता (पण एक पद रिक्त) दहा, राष्ट्रवादीकडे किमान नऊ सदस्य सध्यातरी दिसत आहेत. या सगळ्यांची गोळाबेरीज 31 वर जाते. महाविकास आघाडीकडे आमदार तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी आमदार मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील, राहुल मोटे व सुरेश बिराजदार यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. तर भाजपाकडून स्वतः आमदार पाटील व सुजितसिंह ठाकूर हे सत्तास्थापनेसाठी काय रणनीती आखणार, हे पाहावे लागणार आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना चिन्हावर निवडून आलेल्या किती सदस्यांना पक्षाकडे ठेवण्यात यश मिळते, त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. त्यातही स्वतः राहुल मोटे यांना मानणारे सहा सदस्य असल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार, असे सध्याचे चित्र आहे.

महत्वाच्या बातम्या