पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदी भाजपचे सचिन चिंचवडे

पुणे : पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदी भाजपचे सचिन चिंचवडे यांची निवड झाली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांचा पराभव करत उपमहापौरपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. उपमहापौरपदासाठीही घेण्यात आलेल्या निवडणुकीत चिंचवडे यांना ७९, तर राष्ट्रवादीला ३३ मते मिळाली.

तत्पूर्वी, महापौरपदी भाजपचे राहुलजाधव यांची निवड झाली आहे. त्यांना 80 मते पडली. तर, राष्ट्रवादीचे विनोद नढे यांचा पराभव झाला असून त्यांना 33 मते पडली आहेत.
आजच्या महापौरपदाच्या या निवडीवेळी सत्ताधारी भाजपचे 3 नगरसेवक तर, राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक अनुपस्थित राहिले. तर, अपक्ष पाच नगरसेवक आणि मनसेचे सचिन चिखले यांनी भाजपला मतदान केले. दरम्यान, शिवसेना तटस्थ राहिली.

मावळते महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्यामुळे या दोन्ही पदाच्या निवडीसाठी शनिवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यात आली.

दरम्यान,महापौर राहुल जाधव हे महात्मा जोतिबा फुले यांचा वेश परिधान करुन महासभेत आले होते तर, त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केला होता. वेगळा वेश परिधान करुन महापौरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

मराठा आरक्षण : नितेश राणेंनी पुरावे असतील तर सादर करावेत : आबासाहेब पाटील