साध्वीला पर्यायी उमेदवार मिळाला , भाजपचा दिग्विजयसिंहांच्या विरोधात ‘प्लॅन बी’ तयार

टीम महाराष्ट्र देशा : भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्या हेमंत करकरे बाबतच्या बेलगाम वक्तव्यामुळे साध्वी चर्चेचा विषय ठरली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी साध्वीच्या उमेदवारीवर आक्षेप घेत साध्वीची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे साध्वीची उमेदवारी धोक्यात असल्याने भाजपने वेळीच सावध पाऊले उचलत साध्वी ऐवजी दुसरा उमेदवार तयार करून ‘प्लॅन बी’ ची आखणी केली आहे.

हेमंत करकरे यांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे साध्वीचा राजकीय स्तरातून आणि सामाजिक स्तरातून निषेध केला जात आहे. तर भाजप विरोधी राजकीय पक्षांनी साध्वीच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. त्यामुळे साध्वीची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता असल्याने भोपाल लोकसभा मतदारसंघातून दिग्विजयसिंह यांच्याविरोधात आलोक संजर यांनी भाजपतर्फेच निवडणूक अर्ज भरला आहे.

आलोक संजर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, माझा पक्ष मला जो आदेश देतो त्याचं मी पालन करतो, पण साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रद्द होईल, अशी शक्यता दिसत नाही. तसेच मी भोपाळच्या जनतेसाठी चांगलं काम केलं आहे. माझ्यावर जबाबदारी दिली नाही तरीही मी इथल्या लोकांचं ऋण फेडेन, असंही आलोक संजर म्हणाले.

आलोक संजर यांच्या वक्तव्या नंतर हे स्पष्ट होते की भाजपने साध्वीला दुसरा पर्याय निवडला असून दिग्विजयसिंह यांच्या विरोधात ‘प्लॅन बी’ ची आखणी केली आहे.