बिग ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंचा भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

नवी दिल्ली – भाजपमध्ये नेतृत्वबदलाचे वारे वाहत असून आता महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. तेव्हापासूनच ते प्रदेशाध्यक्षपद सोडतील, अशी चर्चा सुरू झाली होती.

राज्यात आता काही काळातच विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त न ठेवता भाजप लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष निवडणार आहे. या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेके नेते आहेत. इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. तसेच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सुजितसिंह ठाकूर, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख ,ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावांची चर्चा आहे.