भाजपचा निष्ठावान कार्यकर्ताच सांगलीचा महापौर होणार

chandrakant patil

सांगली-  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेल्या शेखर इनामदार यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांमुळेच लोकसभा- विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अच्छे दिन आले आहेत. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांच्या ताकदीवरच आगामी सांगली महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपचा झेंडा फडकलेला दिसेल व मूळ भाजपचा निष्ठावान कार्यकर्ताच महापौर असेल, अशी घोषणा करीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी उपमहापौर शेखर इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विश्रामबाग येथील वाडीकर मंगल कार्यालयात पाटील यांच्याहस्ते सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, विलासराव जगताप, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार दिनकर पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार नितीन शिंदे, रवी अनासपुरे, मकरंद देशपांडे व इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील आदी उपस्थित होते. श्रीराम प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष धनेश कातगडे, शरद नलवडे, गणपती साळुंखे व अमोल कणसे यांच्या नेतृत्वाखाली या नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कुशल व विकासाभिमुख कार्यपध्दीमुळेच लोकसभा- विधानसभा निवडणुकीपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपला घवघवीत यश मिळत आहे. त्यात निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचाही महत्त्वपूर्ण वाटा आहे. शेखर इनामदार यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी विविध उपक्रम राबवून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग भाजपने फुंकले आहे.

केवळ सांगलीच नव्हे, तर आता महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड महापालिकेवरही भाजपचा झेंडा फडकलेला दिसेल. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे. सांगली महापालिकेची सत्ता भाजप स्वबळावर हस्तगत करणार असल्याने कोणाशी आघाडी करण्याचा प्रश्‍नच उदभवत नाही. या महापालिकेचा महापौर हा भाजपचा निष्ठावान कार्यकर्ताच होईल, अशी ग्वाहीही पाटील यांनी दिली.