भाजपचे उपोषण म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ राजू शेट्टी यांचे भाजपवर टीकास्त्र

raju shetti

पुणे: आज देशभरात सत्ताधारी भाजपकडून विरोधकांच्या निषेधार्थ एक दिवसाच लाक्षणिक उपोषण चालू आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांनी चालू दिले नसल्याची टीका भाजपकडून होत आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजपचे उपोषण म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ अशी जोरदार टीका केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारणी बैठक देहू येथे पार पडली. दरम्यान पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत असतांना राजू शेट्टी म्हणाले, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रायव्हेट बिल लोकसभेत मांडणार असून देशातील सर्व विरोधी पक्षांना पाठिंबा देण्याचं आवाहन राजू शेट्टी यांनी केले. भाजप सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. लोकसभेच्या सभापतींनी सांगावं, की कितीवेळ गटनेत्यांच्या बैठक बोलावली किंव्हा हा तिढा सुटावा म्हणून सर्वांची बैठक घेतली. सरकारच काही लोकांना हाताशी धरून सभागृहात कामकाज चालू देत नसल्याचे आरोप खासदार शेट्टी यांनी केले. तसेच सत्याचा आग्रह धरून उपोषण करणाऱ्या लोकांनी आधी ट्रेनिंग घ्यावं असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात मसुदा मांडणार असून ३२ पक्षांनी या मसुद्याला पाठिंबा दिला आहे. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या १ मे पासून धर्मा पाटलांच्या गावातून ‘मी आत्महत्या करणार नाही, मी लढणार’ हे अभियान सुरू करणार, असल्याचे शेट्टी म्हणाले.