राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपच्या गिरीराज सिंह यांची इटालियन भाषेत पोस्ट

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नसल्याची आश्चर्यजनक माहिती आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे कोरोनाच्या काळातील मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मृत्युची आकडेवारी केंद्र सरकारला सादर करतात. या आकडेवारीनुसार ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नाहीत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली आहे.

आरोग्य हा राज्याचा विषय असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीत म्हटले आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नसल्याचा दावा केल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्रावर निशाणा साधला आहे. फक्त ऑक्सिजनची कमतरता नव्हती. सत्य आणि संवदेनशीलतेची कमतरता होती व आजही आहे, असे गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या या टीकेला भाजपा नेते गिरीराज सिंग यांनी इटालियन भाषेत पोस्ट टाकत उत्तर दिले आहे. ‘मी या राजकुमाराबद्दल बोलेन: त्यावेळी त्याच्याकडे मेंदूची कमतरता होती, आत्ताही आहे आणि नंतरही राहील. या याद्या राज्यांनी संकलित केल्या आहेत. आपण आपल्या पक्षाचे सरकार असणाऱ्या राज्यांना सुधारित याद्या पाठवण्यास सांगू शकता. तोपर्यंत खोटे बोलणे थांबवा,’ असे आवाहन गिरीराज सिंह यांनी केले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही असं केंद्र सरकार म्हणतंय. मग रुग्णांचा मृत्यू खालील कारणांनी झाला – ऑक्सिजनची निर्यात केंद्र सरकारने ७००% पर्यंत वाढवली. या रुग्णांचा मृत्यू झाला कारण केंद्र सरकारने ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी टँकर ची व्यवस्था केली नाही. एंपावर्ड ग्रुप आणि संसदीय समितीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून ऑक्सिजनच्या उपलब्धतेची व्यवस्था केली नाही. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उपलब्ध करून देण्याची व्यवस्था नाही केली,’ अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP