fbpx

श्रीरामाचा अपमान करणाऱ्याला पक्षात घेतल्याने भाजपाचा पराभव- संजय राऊत

sanjay-raut

नवी दिल्ली: सर्व देशाचे लक्ष असणाऱ्या उत्तर प्रदेश पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. विजयाची घोडदौड सुरु ठेवणाऱ्या भाजपसाठी हि निवडणूक प्रतिष्ठेची आहे. एकाही जागेवर पराभव झाल्यास भाजपासाठी हा मोठा धक्का समजल्या जाणार असून योगींचा बालेकिल्ला ढासळणार असल्याचे चित्र दिसत आहेत. दरम्यान, श्रीरामाची निंदा करणाऱ्यांना पक्षात घेतल्याने उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, मला वाटत नाही की उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत सपा आणि बसपाची युती निर्णायक ठरली. माझ्या मते ज्यादिवशी भाजपाने श्रीरामाचा अपमान करणाऱ्या सपाच्या नेत्याला (नरेश अग्रवाल) लाल गालिचे अंथरून पक्षात प्रवेश दिला, तेव्हाच त्यांचा पराभव निश्चित झाला होता. ते प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. शिवसेनेने गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाच्या पराभवाची चाहुल लागताच टीका करण्याची संधी साधली.

‘गोरखपूर मी रहना होगा तो योगी योगी कहना होगा’ याच मतदारसंघात भाजपची ही घोषणा फोल ठरली आहे. कारण समाजवादी पक्षाने निसटती आघाडी घेतली आहे. तर फुलपूर मतदारसंघातही सपाने तब्बल १२००० मतांची आघाडी मिळवली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकांसाठी एकत्र येण्याचा सपा आणि बसपाचा निर्णय योग्य असल्याचे दिसून येत आहे.