‘निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपने ५०चा आकडाही गाठला नसता’

modi

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मतमोजणीच्या कलांवरून त्या राज्यात ममता बॅनर्जींची लाट कायम असल्याचं स्पष्ट झालंय. तृणमूलने दोनशेंच्या वर जागांवर आघाडी घेतली असून बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता राज आता पाहायला मिळणार आहे. पश्चिम बंगालमध्ये १५० च्या वर जागा जिंकू असा दावा करणाऱ्या भाजपला त्याच्या अर्ध्या जागांवर समाधान मानावे लागणार आहे. देशात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अनेक बड्या नेत्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जास्त रस असल्याचं दिसून आले.

याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ‘निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपला ५० पेक्षा अधिक जागाही मिळाल्या नसत्या, असा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केला. निवडणूक आयोग भाजपचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं. निवडणूक आयोगाची एकंदरित वागणूकच भयंकर होती,’ अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

‘तृणमूल काँग्रेसची यंदा डबल सेंच्युरी होईल आणि आम्ही २२१ चा आकडा गाठू, असा आम्हाला विश्वास होता. मी रस्त्यावर उतरून लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की, आम्ही दोनशेपार जाऊ तर भाजप ७० पारही जाणार नाही. निवडणूक आयोगाने भाजपला मदत केली नसती तर त्यांना ५० जागाही मिळाल्या नसत्या,’ असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रांशी छेडछाड करण्यात आली. तर काही ठिकाणी पोस्टल बॅलेटस् रद्द ठरवण्यात आली, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. मात्र, मी बंगालच्या लोकांना सलाम करते. त्यांनी फक्त पश्चिम बंगालच नव्हे तर संपूर्ण देशाला वाचवल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा त्यांचा करिश्मा दाखवून दिला आहे. ममता बॅनर्जींचा पराभव करण्यासाठी, राज्यात सत्ताबदल घडवण्यासाठी भाजपनं जंगजंग पछाडलं. मात्र तरीही ममता बॅनर्जींनी हॅटट्रिक केली आहे. याच दरम्यान अनेक नेते ममता बॅनर्जींचं कौतुक करत आहेत. त्यांना शुभेच्छा देत आहेत.

महत्वाच्या बातम्या