भाजप देशासाठी काम करत तर कॉंग्रेस कुटुंबासाठी : प्रकाश जावडेकर

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस नेत्यांना पक्षात भवितव्य दिसत नसल्याने आणि काँग्रेस नेतृत्वाची प्रेरणा देण्याची क्षमता संपली असल्याने कॉंग्रेस नेते आता भाजपकडे वळाले आहेत. तसेच भाजप पक्ष म्हणून कुठल्याही फोडाफोडीच्या नीतीमध्ये सामील नाही, मात्र येणाऱ्या लोकांसाठी आम्ही दरवाजे बंद करु शकत नाही, असं म्हणत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वावर शंका व्यक्त केली आहे. ‘एबीपी माझा’च्या एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जावडेकर म्हणाले की, काँग्रेस एका कुटुंबासाठी काम करत आहे आणि भाजप देशासाठी काम करतो, हा भाजप कॉंग्रेस मधील फरक आहे. कारण काँग्रेस सध्या नेतृत्व नसलेला पक्ष आहे. काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खचला असून त्यांची लढण्याची जिद्द संपली आहे. एका कुटुंबाच्या बाहेर काँग्रेस जात नसून क्षमता नसतानाही एकाच घराकडे पक्षाचं नेतृत्व आहे, असे ते म्हणाले.

तसेच काँग्रेस नेतृत्वाची प्रेरणा देण्याची क्षमता संपली आहे. कर्नाटकातील जे आमदार पक्षातून बाहेर पडले त्यांनी काँग्रेसमधील कार्यपद्धतीला कंटाळून राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे गोव्यातही तशीच परिस्थिती आहे. अनेकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे ते स्वत: भाजपमध्ये सामील होत आहेत, असे जावडेकर म्हणाले.