कर्नाटकात भाजपचा विजय अटळ – बी.एस. येडियुरप्पा

bs yediyirappa

बंगळुरु – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी १२ मेला मतदान झाले. उद्या या निवडणुकीचा निकाल आहे. कॉंग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. दोन्ही पक्षांकडून देखील सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येतोय.

दरम्यान कर्नाटकात भाजप १२५ ते १३० जागांसह सत्तेत येईल हे लेखी देतो, असे आव्हान भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी.एस. येडियुरप्पा यांनी दिले आहे. भाजपच्या बाजूने लाट होती असा दावा त्यांनी केला. कर्नाटकच्या राजकारणात मी अनेक वर्षे आहे. त्यामुळे निकाल लागल्यावर माझ्या दाव्याची सत्यता पडताळून पाहा असे येडियुरप्पा यांनी सांगितले. काँग्रेसला ७० पेक्षा जास्त जागा मिळणे कठीण आहे, तर धर्मनिरपेक्ष जनता दल जेमतेम २४ ते २५ जागा जिंकेल असे भाकीत येडियुरप्पा यांनी वर्तवले आहे.

तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस बाजी मारणार असल्याचा दावा केलाय. तसेच ही आपली शेवटची निवडणूक असून, यानंतर आपण निवडणूक लढवणार नसल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हण्टलं. ते आपल्या चामुंडेश्वरी मतदार संघात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. धर्मनिरपेक्ष जनता दलाशी युतीची गरज काँग्रेसला भासणार नसल्याचं देखील ते म्हणाले.