‘भाजप यशापयशाची पर्वा न करता केवळ ओबीसी समाजाचेच उमेदवार देणार’

devendra fadanvis

मुंबई : राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपने राज्यसरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून आज अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाचे फोटो ट्वीट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या विश्वासघाताच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने नेते-कार्यकर्ते यात सहभागी झाले आणि राज्य सरकारचा तीव्र निषेध केला.

या जागांवर भारतीय जनता पार्टी यशापयशाची पर्वा न करता केवळ आणि केवळ ओबीसी समाजाचेच उमेदवार देईल, अशी घोषणा आम्ही यापूर्वीच केली आहे. ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे.’ अशी स्पष्ट भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे.

तर भाजपच्या या आंदोलनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. पटोले म्हणाले की, केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी दिली नाही. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या. यामुळे फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करावे’ असा खोचक सल्ला पटोले यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या