fbpx

भाजप प्रणित एनडीए लोकसभेच्या 370 जागा जिंकतील – रामदास आठवले

ramdas-athawale

लखनौ – उत्तर प्रदेशात सपा बसपाला यश मिळणार नाही. काँग्रेस च्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या प्रचारामुळे काँग्रेसचे मतदान वाढेल त्यामुळे सपा बसपा युतीला फटका बसून भाजपचा उत्तर प्रदेशात विजय होईल असे सांगत देशभरात भाजप प्रणित एनडीए 370 जागांवर जिंकणार असून पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापन होईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्ष 15 जागांवर निवडणूक लढणार असून अन्य 65 जागांवर भाजप ला आरपीआयचा पाठिंबा देणार असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली. यावेळी आरपीआय च्या अधिकृत 15 उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केली.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 2 जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात याव्यात यासाठी उत्तर प्रदेश भाजप चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यूपी भाजप प्रदेश अध्यक्ष महेंद्रनाथ पांडे, तसेच यूपी भाजप चे प्रभारी सुनील बन्सल यांच्याशी चर्चा केली होती. मात्र त्यावर त्यांनी कोणताही प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे आमच्या नोंदणीकृत पक्षाला काही जागा लोकसभेच्या लढणे आवश्यक असल्याने आम्ही उत्तर प्रदेशात 15 जागा लढत असून अन्य 65 जागांवर भाजप ला पाठिंबा दिला आहे अशी माहिती  रामदास आठवले यांनी आज दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 5 वर्षांत चांगले काम केले आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांचे काम केले आहे.सामान्य माणूस मोदींच्या विरुद्ध नाही केवळ काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदींच्या विरुद्ध प्रचार करीत आहे. त्या प्रचाराचा उपयोग होणार नाही. आम आदमी नरेंद्र मोदिंसोबत राहणार आहे. त्यामुळे मागासवर्गीय बहुजनांचे मतदान भाजप एनडीए च्या उमेदवारांना होईल त्यामुळे देशभरात भाजप 300 आणि एनडीए एकूण 370 जागांवर विजयी होईल असा विश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.