पालघर पोटनिवडणुक : हतबल भाजपचे नारायण राणे यांना साकडे

ठाणे : पालघर पोटनिवडणुकीत चिंतामण वनगा यांच्या मुलाला उमेदवारी देऊन कुरघोडी करणाऱ्या शिवसेनेला तिच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भाजप नारायण राणे यांना शरण गेल्याचं चित्र आहे. पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेने चिंतामण वनगा यांच्या मुलाला उमेदवारी देऊन भाजपपुढे कडवे आव्हान निर्माण केलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात शिवसेनेविरोधात मुलुखमैदानी तोफ वापरायचे ठरवले आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खासदार नारायण राणे यांना प्रचारात उतरण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे राणे यांनीही मुख्यमंत्र्यांची ही विनंती मान्य केली आहे.

या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली आहे.  वनगा यांच्या कुटुंबानं गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्याने भाजपासमोरील अडचणी वाढल्या होत्या.त्यामुळे पालघर पोटनिवडणुकीच्या आगामी प्रचारात शिवसेना विरुद्ध नारायण राणे अशा कट्टर हाडवैऱ्यांचा सामना रंगताना दिसेल.

Gadgil