‘चौफेर टीका होत असल्याने भाजपने ‘जाणता राजा’चा मुद्दा उकरून काढला’

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय असा प्रश्न पडतो असं यावेळी उदयनराजे यांनी म्हटलं. पुस्तकाबद्दल ऐकून वाईट वाटलं. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे उदयनराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर देखील जोरदार घणाघात केला आहे. आज कोणालाही जाणता राजा उपाधी दिली जाते, कोणाला दिली गेली मला माहित माहित नाही. पण जाणता राजा फक्त एकच छ.शिवाजी महाराज. अस म्हणत उदयनराजे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर कोणालाही जाणते राजे म्हणून घेण्याचा अधिकार नाही, आणि जे त्यांना जाणते राजे म्हणत असतील ते शिवाजी महाराजच अपमान करत असल्याचे देखील उदयनराजे म्हणाले. उदयनराजे यांच्या या टीकेला उत्तर द्यायला गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड पुढे सरसावले आहेत.

‘होय शरद पवार हे जाणता राजा आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न…प्रश्नांची मालिका सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेतच,’ असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे भोसले यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आता या वादात मनसेने उडी घेतली असून पुस्तकावरील वाद मोदींची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली म्हणून पेटला असून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. अशी भूमिका मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील-ठोंबरे यांनी स्पष्ट केली .

रुपाली पाटील पुढे असंही म्हणाल्या, ‘जाणता राजा म्हणजे जाण असलेला, जाणता राजा ही पदवी अश्या राजांना प्रदान झाली की ज्या राजांना प्रजेची समस्या, त्रास,अडचण याची जाण आहे. त्या काळीची ही पदवी आता जर कोणी तशा प्रकारची कामे केली म्हणून वापरली, तरी ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना होत नाही.

महाराष्ट्र देशाला प्रतिक्रिया देताना पाटील नेमकं काय म्हणाल्या?
कोणी स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज म्हणणे किंवा कोणी स्वतःची तुलना महाराजांशी करणे हे निषेधार्यच आहे . तसेच जसा छत्रपतींच्या वंशजांना महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. तसाच हा अधिकार आमच्यासारख्या शिवरायांच्या कडवट मावळ्यांना सुद्धा आहे .

भाजपच्या भूमिकेचा समाचार घेतानाच पाटील म्हणाल्या, ‘आता मोदीं साहेबांवर टीका होत आहे, म्हणूनच त्यांच्या पक्षातील लोक जुनं काहीतरी उकरून वेळ मारून नेत असून ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज किंवा मावळे यांना नक्कीच शोभणारी नाही.

वर्षानुवर्ष जाणता राजा बिरूद वापरत असतांना तुम्ही विरोधात साधा उच्चारही केला नाही आणि आता महाराजांबरोबर तुलना केली म्हणून टीका होत असताना ही बचाव करण्याची खेळी भाजप खेळत आहे.