निवडणुकीच्या तोंडावर भाजप करणार विद्यमान आमदारांच ऑडीट, ३० % आमदार घरी बसवणार

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या दृष्टीने प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. भाजप – सेना या विधानसभा निवडणुकीला युती करून सामोरी जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढायची देखील तयारी केली आहे. अशातचचं भाजप विद्यमान आमदारांचे ऑडीट करणार आहे. ३० % आमदारांच तिकीट कापण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

ज्या आमदाराने आपल्या कार्यकाळात समाधानकारक काम केले नाही, ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत. तसेच निवडून येण्यासाठी स्थानिक राजकीय गणिते प्रतिकूल आहेत अशा ठिकाणच्या आमदारांच्या हातावर पक्ष नारळ ठेवणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये पुण्यातील दोन आमदारांचा नंबर लागण्याची शकयता आहे. हडपसर आणि शिवाजीनगर मतदारसंघातील आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

तसेच कसबा विधानसभा मतदारसंघासाठी नवीन उमेदवार भाजपला शोधावा लागणारा आहे. कसब्याचे पारंपारिक आ. गिरीश बापट यांनी लोकसभेत उडी घेतल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून चाचपणी सुरु आहे. तसे पाहता कसबा विधानसभा मतदारसंघासाठी अनेक स्थानिक नेते इच्छुक आहेत. मात्र अंतिम निर्णय उमेदवारीसाठी असलेली कोअर कमिटी घेईल. या कमिटीचा निर्णय अंतिम असेल, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान पुण्यात कोथरूडमधून मेधा कुलकर्णी, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून जगदीश मुळीक, हडपसरमधून योगेश टिळेकर, खडवासल्यातून भीमराव तापकीर, कॅन्टोन्मेन्टमधून माजी मंत्री दिलीप कांबळे, पर्वतीतून माधुरी मिसाळ तर शिवाजीनगरमधून विजय काळे हे विद्यमान आमदार आहेत.