डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जिवंतपणी मारण्याचे काम कॉंग्रेसने केले – संबित पात्रा

नवी दिल्ली: देशाला स्वातंत्र मिळाल्यापासून ७० वर्षात गांधी घराण्याची कायम असणारी सत्ता एका सामान्य व्यक्तीने हलवून ठेवल्याच कॉंग्रेस घराण्याला पचत नाही, त्यामुळेच राहुल गांधी हे देश आणि संविधान धोक्यात आल्याचा खोटा प्रचार करत असल्याची टीका भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. तसेच आज राहुल गांधी आपल्या भाषणात देशाला कॉंग्रेसने संविधान दिल्याच सांगतात, अस बोलणे म्हणजे कॉंग्रेसची शोकांतिका असल्याची टीकाही पात्रा यांनी यावेळी केली. भाजप कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आजपासून संविधान बचाव अभियानाला सुरुवात केली आहे. दिल्लीतील तालकटोरा मैदानात काँग्रेसतर्फे संविधान बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबोधित करत असताना त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला. दरम्यान, राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपकडून देखील उत्तर देण्यात आले आहे. देशाला संविधान काँग्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले असल्याच राहुल गांधी सांगतात, मात्र आंबेडकरांना जिवंतपणी मारण्याचे काम कॉंग्रेस घराण्याने केल्याची टीका संभीत पात्रा यांनी केली.

जो व्यक्ती मोबाईलमध्ये लिहिलेले बघितल्याशिवाय वाचू शकत नाही, जो १५ ओळीसुद्धा स्वत लिहू शकत नाही. तो मला संसदेत १५ मिनिटे बोलयाचे आहे म्हणत असल्याची टीका पात्रा यांनी केली आहे . तसेच देशात आज शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या होत असतील तर ते कर्नाटकमध्ये होतात, याचे उत्तर राहुल गांधी आणि सिद्धरामय्या देणार का? असा सवाल पात्रा यांनी उपस्थित केला आहे.