‘आंदोलनातून भाजपानं दुहीची बीजं पेरली, जनता माफ करणार नाही’

Jitendra Awhad

मुंबई : कोविड 19 मुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यात राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला दारुण अपयश आल्याचा आरोप करत प्रदेश भाजपानं राज्यव्यापी महाराष्ट्र बचाव आंदोलन काल करण्यात आलं.

कोविड 19 मुळे नागरिकांचे प्राण जात असताना हे सरकार पूर्णपणे दिशाहीन, अनुभवशून्य आणि समन्वयहीन ठरलं असून ते विषाणूपेक्षाही घातक असल्याचं ट्वीट पक्षानं केलं आहे. मुंबईत पक्षाच्या मुख्यालयासमोर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. राज्यात इतरत्रही पक्षकार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.

महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाकडून मात्र भाजपच्या या आंदोलनाची खिल्ली उडवली गेली. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे. आंदोलनातून भाजपानं दुहीची बीजं पेरली, जनता माफ करणार नाही, अशी टीका आव्हाड यांनी केली.

“संकटात सापडलेला तुमच्या माझ्या महाराष्ट्रला सावरण्यासाठी एकी महत्वाची आहे. असं असताना महाराष्ट्रद्रोही भाजपानं आंदोलन करून दुहीची बीजं पेरली. जनता हे कधी विसरणार नाही आणि माफही करणार नाही,” असं म्हणत आव्हाड यांनी भाजपावर टीकेचा बाण सोडला. त्यांनी ट्विटरवरून आपलं मत व्यक्त केलं. तसंच यापुढे त्यांनी सत्तेचा हव्यास असा हॅशटॅगही वापरला आहे.