राजेंद्र जंजाळ यांच्यावर खोटे आरोप लावणे ‘भाजप’ने बंद करावे, अन्यथा प्रत्युत्तर देण्यास युवासेना तयार!

औरंगाबाद : गारखेडा येथील लसीकरण केंद्रावर प्रा. गोविंद केंद्रे आणि शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी गोविंद केंद्रे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात मंगळवारी युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘राजेंद्र जंजाळ यांना बदनाम करण्यासाठी भाजपने हा कट रचला आहे. लवकरात लवकर भाजपाने खोटे आरोप लावणे बंद करावे अन्यथा युवासेना प्रतिउत्तर देण्यासाठी तयारच असल्याचा इशारा औरंगाबाद युवासेनेतर्फे देण्यात आला आहे.

विजयनगरमधील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रावर टोकण वाटण्यावरुन झालेल्या वादात भाजप ओबीसी आघाडीचे पदाधिकारी प्राध्यापक गोविंद केंद्रे यांना मारहाण करण्यात आली होती. लसीकरण केंद्रावर टोकन वाटपावरुन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. या प्रकरणात मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर मारहाण झाल्याचा आरोप प्राध्यापक केंद्रे यांनी केला आहे. या घटनेमुळे भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

या प्रकरणात प्राध्यापक केंद्रे यांच्या फिर्यादीवरुन राजेंद्र जंजाळ, अमोल पाटे, आकाश राऊत आणि एका अज्ञात इसमाविरुद्ध जवाहनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात राजेंद्र जंजाळ यांच्यावर भाजपतर्फे अनेक आरोप करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर युवासेनेतर्फे भाजपला इशारा देण्यात आला आहे. भाजपाच्या नगरसेविकेचे पति गोविंद केंद्रे यांचा लसीकरण केंद्रावर चाललेला काळा बाजार शिवसेनेने जनतेच्या समोर आणला.

त्यांचे कारस्थान लपविण्यासाठी उपमहापौर राजेंद्र जंजाळ व त्यांच्या सहकाऱ्यांवर खोटे आरोप केले जात आहेत. जंजाळ यांचे नाव बदनाम करण्याचा डाव बंद करावा. उपमहापौर राजेंद्रजी जंजाळ यांचे सामाजिक कार्य औरंगाबादच्या जनतेला माहित आहे. भाजपाच्या केंद्रे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी खोटे आरोप करू नये अन्यथा युवासेनेतर्फे त्यांना प्रतिउत्तर दिले जाईल. असा इशारा युवासेना उपशहर प्रमुख शुभम पवार यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या