fbpx

भाजप-शिवसेनेला पालघरच्या जमिनी हव्या आहेत- अशोक चव्हाण

ashok chawan

पारोळा- पालघर लोकसभा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, जनता दल सेक्युलर आघाडीचे उमेदवार दामोदर शिंगडा यांच्या प्रचारार्थ पारोळा व वसई येथील प्रचार सभेत बोलतांना चव्हाण म्हणाले की, राज्यातल्या व केंद्रातल्या सरकारने गेल्या चार वर्षात वसई, विरार, पालघरच्या विकासासाठी केलेले एक काम दाखवावे व नंतर मते मागावीत. काँग्रेस सरकारने पालघर जिल्ह्याची निर्मिती केली. भाजप शिवसेनेची सत्ता आल्यापासून पालघर जिल्ह्याचा विकास ठप्प झाला आहे. भाजप, शिवसेनेला पालघर जिल्ह्याचा विकास नाही तर पालघर जिल्ह्यातील जमिनी हव्या आहेत म्हणूनच मुख्यमंत्र्यांसह शिवसेना, भाजपचे मंत्री व नेते पालघर जिल्ह्यात फिरून जमिनी शोधत आहेत असा घणाघाती आरोप केला आहे.

वसई, विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील ठोकशाही मोडीत काढून लोकशाही आणण्यासाठी काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार दामोदर शिंगडा यांना विजयी करा असे अशोक चव्हाण यांनी केले.

वसई, विरार, पालघरच्या लोकांना कामासाठी रोज मुंबईला जावे लागते, अहमदाबादला नाही. त्यामुळे त्यांना बुलेट ट्रेनची नाही तर लोकल ट्रेनची गरज आहे. भाजप सरकारला लोकल ट्रेन नीट चालवता येत नाही आणि बुलेट ट्रेनच्या गप्पा मारत आहेत. अगोदर लोकल ट्रेन नीट चालवा असा टोला लगावत आपण दोघे भाऊ मिळून खाऊ अशा पध्दतीने शिवसेना, भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र बसून सत्तेचा लाभ घेत आहेत.

शिवसेना सरकारच्या धोरणाशी सहमत नसेल तर मग सत्तेत का आहे? शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्यानेच भाजपासोबत पापाची वाटेकरी झाली आहे. वसई, विरारवासियांनो कोणाच्या दहशतीला घाबरू नका राज्यात आणि देशात परिवर्तन अटळ आहे. काँग्रेसचेच सरकार येणार आहे. आम्ही ठोकशाहीचा बिमोड करु त्यामुळे निर्भय होऊन पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दामू शिंगडा यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी नागरिकांना केले.