लोकसभेचे तिकीट कापलेल्या किरीट सोमय्यांचे भाजप करणार पुनर्वसन

किरीट सोमैया

टीम महाराष्ट्र देशा – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेकडून सातत्याने विरोध होत होता. आता सोमय्या यांचा भाजपने कायमचा पत्ता कट केला आहे. सोमय्यांच्या जागी मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून लोकसभा रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

शिवसनेने सोमय्यांचा लोकसभेतून पत्ता कट केला असला तरी आता भाजप किरीट सोमय्या यांचे पुनर्वसन करून राज्यसभेवर त्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोमय्या यांच्यासाठी हि दिलासा देणारी जरी बाब असली तरीही लोकसभेची उमेदवारी गमावल्याची साल सोमय्या यांच्या मनात कायम राहणार आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरु असताना सोमय्या यांनी सेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे शिवसैनिकांनी सोमय्या यांना टोकाचा विरोध केला. अखेर सोमय्या यांच्या अनेक प्रयत्नांनंतरही त्यांचे तिकीट कापले गेले.

दरम्यान, शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सोमय्या यांनी जोरदार प्रयत्न केले. सोमय्या यांनी भाजपमधील शिवसेनेच्या मित्रांकडून मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.