सोलापूर बाजार समितीवर भाजपचा सभापती, पहिल्यांदाचं मिळाला भाजपला बहुमान

vijaykumar deshmukn

टीम महाराष्ट्र देशा: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच भाजपला सभापती पदाचा बहुमान मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते विजयकुमार देशमुख यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

प्रथमच सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर सोलापूर बाजार समितीची निवडणूक मागील वर्षी पार पडली होती, निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनल विरोधात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यासोबत आघाडी केली होती. यामध्ये १८ पैकी १६ जागांवर देशमुख – माने गटाला विजय मिळाला होता, तर सहकारमंत्र्यांच्या पॅनलला केवळ दोन उमेदवार विजयी करत आले होते.

निवडणुकीनंतर प्रथम माजी आ दिलीप माने यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली. माने यांनी ठरल्यानुसार मागील पंधरा दिवसांपूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर नवीन सभापती निवडीत मोठे नाट्य रंगले होते. अखेर विजयकुमार देशमुख यांनी मित्रपक्षांतील सदस्यावर कुरघोडी करत सभापती पद आपल्या पारड्यात पाडून घेतले आहे.