शिवेंद्रराजेंना पक्षात प्रवेश देण्यासाठी भाजपने टाकला ‘हा’ मोठा डाव ?

टीम महाराष्ट्र देशा :  साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. शिवेंद्रराजे भाजपकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रयत्नशील असल्याचेही बोलले जात आहे. अशातच त्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाजपचे नेते, जि.प. सदस्य दीपक साहेबराव पवार यांची महाराष्ट्र राज्य विकास महामंडळावर नियुक्ती झाली आहे. दीपक पवार हे भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा पराभव करून ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले. भाजपचे सातारा, जावली मतदार संघाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते. मधल्या काळात शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवेंद्रराजेंना भाजपमध्ये सन्मानाने घ्यायचे असेल तर अगोदर दिपक पवारांचे पुनर्वसन करावे लागेल, त्यामुळेच पवारांची महाराष्ट्र राज्य विकास महामंडळावर वर्णी लावण्यात आली आहे.

दीपक पवार यांच्या या निवडीमुळे आता शिवेंद्रराजे यांच्यासाठी मैदान मोकळे झाले आहे. कारण भाजपकडून दीपक पवार हेच उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार होते. परंतु आता ते भाजपमध्ये प्रवेश आणि उमेदवारीही सहज मिळवू शकतात त्यामुळे त्याचा भाजपमधील प्रवेश आता निश्चित मानला जात आहे.