विधानसभेतील पराभवानंतर अखेर पंकजा मुंडे यांना मिळाला सुखद धक्का

pankaja munde gopinath

रेणापूर :  रेणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या आरती प्रदीप राठोड, तर उपनगराध्यक्षपदी अभिषेक आकनगिरे यांची मंगळवारी (ता. 10) निवड झाली आहे. त्यामुळे येथे वर्चस्व कायम ठेवण्यात भाजपला यश आले आहे.रेणापूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व तब्बल 25 वर्षे माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केले. मतदार संघाच्या पुनर्रचनेत हा तालुका लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात समाविष्ट झाला. या मतदार संघात मुंडे यांना माननारा मोठा वर्ग आहे.

रेणापूर नगरपंचायतीची पहिली पंचवार्षिक निवडणूक 24 मे 2017 रोजी झाली होती. या निवडणुकीत भाजपचे 8, कॉंग्रेसचे 5, राष्ट्रवादी 1, अपक्ष 1, कॉंग्रेस पुरस्कृत 1, भाजप बंडखोर 1 असे एकूण 17 सदस्य विजयी झाले. त्यावेळी नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गाला सुटले होते. भाजप नेते रमेश कराड यांनी एक अपक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका सदस्याच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष म्हणून भाजपचे अभिषेक आकनगिरे यांना संधी दिली. तर उपनगराध्या म्हणून राष्ट्रवादीच्या राबीयाबी शेख यांची निवड झाली होती.

दरम्यान, आता नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ता. 9 डिसेंबर रोजी संपला. पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी सुटले. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी नवीन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार ता. 5 डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून आरती राठोड, तर कॉंग्रेसकडून शीला प्रेमनाथ मोटेगावकर यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.

नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी मंगळवारी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात भाजपच्या आरती राठोड यांना भाजपचे 8, राष्ट्रवादी 1 व अपक्ष 1 अशी एकूण 10 मते मिळाली. तर कॉंग्रेसच्या शीला मोटेगावकर यांना 5 मते मिळाली. यावेळी कॉंग्रेसच्या नगरसेविका रजियाबी पाशा शेख आणि अपक्ष नगरसेवक गजेंद्र चव्हाण हे अनुपस्थित राहिले.

यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडीत विद्यमान भाजपचे नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी उपनगराध्यक्ष म्हणून अभिषेक आकनगिरे यांची निवड झाल्याचे घोषित केले. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यमान उपनगराध्यक्षा राबीयाबी शेख आणि अपक्ष नगरसेविका सुमन मोटेगावकर या दोघांच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष म्हणून आरती राठोड, तर उपनगराध्यक्षपदी अभिषेक आकनगिरे यांची निवड झाली. त्यामुळे नगरपंचायतीवर पुन्हा भाजपचे वर्चस्व कायम राहिले.

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी कांबळे यांच्यासह तहसीलदार राहुल पाटील, प्रभारी मुख्याधिकारी वसुधा फड, तलाठी गोविंद शिंगडे यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.