भाजप विरोधी शिवसेनेचे मंत्री एकवटले

धर्मा पाटील यांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांना विचारला जाब

मुंबई : शिवसेना प्रमुख यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. तेव्हापासून भाजप आणि सेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु आहे. स्वबळाची घोषणा केल्यापासून सध्या सरकारमध्ये असूनही शिवसेना भाजप वर टीका करत आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी विविध मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक झाली. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या बैठकीकडे होते. कारण शिवसेना आणि भाजपचे मंत्री पहिल्यांदाच आमने-सामने येणार होते. शिवसेनेचे तीन मंत्री मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भर बैठकीतच एकवटले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विविध मुद्द्यांवरुन मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं. विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेण्यावरुन सुभाष देसाई आणि रामदास कदम मंत्रिमंडळाच्या बैठकीत संतापले. दिवाकर रावतेंनी धर्मा पाटील यांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांना जाब विचारला. आजच्या बैठकीतील चित्र पाहता आगामी राजकीय वातावरण चांगलच तापण्याची चिन्ह आहेत.