सेनेच्या विकासकामांमुळे भाजप बॅकफुटवर?

devendra fadnvis

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच पालिका प्रशासनाकडून शहरात या महिन्यात विविध विकासकामांच्या लोकार्पणाचा धडाका सुरू करण्यात आला आहे. शहरात शुक्रवारी (दि.१५) पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते तर शनिवारी (दि.१६ )पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन केले जाणार आहे.

यात प्रामुख्याने पडेगाव, चिकलठाणा आणि कांचनवाडी हे तीन कचरा प्रक्रिया प्रकल्प, स्मार्ट सिटीतील पोलिस आयुक्तालयातील कमांड आणि कंट्रोल सेंटर, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे जालना रोडवरील म्यूरल्स या कामांचा यात समावेश आहे. या विकासकामांच्या धडाक्याचा फायदा निवडणुकीत शिवसेनेला होणार आहे. यामुळे आपसूक भाजप बॅकफुटवर जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कोरोनामुळे महापालिकेची निवडणूक गेली अनेक महिने लांबलेली आहे.लवकरच पालिकेची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवरच या विकास कामांचे लोकार्पण तसेच काही कामांचे भूमीपूजन या जानेवारी महिन्यात होणार आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते चिकलठाणा, कांचनवाडी येथील बायोगॅस प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. याशिवाय शहरात स्मार्ट सिटीतून बनवण्यात आलेल्या शंभर बस थांब्यामधील एका बस थांब्याचे पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते रेल्वेस्टेशन येथे लोकार्पण होईल.

तर दुसर्‍या दिवशी १६ जानेवारी रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या अमरप्रित येथील म्यूरल्सचे अनावरण, पडेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण, कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रुमचे उद्घाटन होणार आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावरच आयुक्त पांडेय यांनी विविध विकासकामांच्या लोकार्पणाचा संगम जुळवून आणला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटातून आयुक्त पांडेय शिवसेनेच्या पारड्यात मतांचा कौल टाकण्यासाठीच शिवसेना नेत्यांच्या सूचनेवरून कृती करत असल्याचा आरोप केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या