सोलापूर: भाजपकडून कार्यकर्ते वाऱ्यावर, पदे असलेल्यांनाच पुन्हा संधी

सोलापूर-  विधानसभा निवडणुकीस एक वर्ष शिल्लक असताना शासनाने जिल्हा नियोजन समितीवरील निमंत्रित सदस्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, विक्रम देशमुख यांच्यासह १२ सदस्यांचा समावेश आहे. निमंत्रित सदस्य नियुक्ती करताना भाजप, शिवसेना, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांना संधी दिली आहे. यामध्ये ज्यांकडे पक्षाची पदे आहेत, त्यांनाच पुन्हा नियोजन समितीवर संधी दिली आहे.

भाजपकडून शहाजी पवार, विक्रम देशमुख, शंकर वाघमारे, श्रीकांत देशमुख, शशिकांत चव्हाण, संजय कोकाटे, शिवसेनेकडून डॉ. धवलसिंह मोहिते, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शेतकरी संघटनेचे दीपक भोसले यांना संधी दिली आहे. निमंत्रितामध्ये अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी, करमाळा या तालुक्यांना संधी दिल्याचे दिसत नाही. निमंत्रित सदस्य म्हणून निवड केलेल्यांकडे पक्षाची जबाबदारी असताना पुन्हा नियोजन समितीवर सदस्याची संधी दिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर चार वर्षांनी नियोजन समितीवर निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. पण हे सदस्य नियुक्त करताना ज्यांनी यापूर्वी पदे उपभोगली आहेत, त्यांनाच संधी दिली आहे. यामुळे कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? असा प्रश्न कार्यकर्ते करीत आहेत. एकंदरीत या निवडीवर शहर, जिल्ह्यातील अनेक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

You might also like
Comments
Loading...