आता भंडारा जिंकू “ठोकून”, तर पालघर जिंकू “ठासून”

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केल आहे. त्यामुळे या यशाने भाजपच्या नेत्यांमध्ये आक्रमकता जास्तच वाढल्याच दिसून येत आहे. आता हेच पहा ना भाजप नेते आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे की कर्नाटकात जिंकलो मतदारांचे आभार! आता भंडारा जिंकू “ठोकून”, पालघर जिंकू “ठासून”. यावरूनच भाजपची आक्रमकता दिसून येत आहे. आगामी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलार यांच्या या ट्विटमुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात मुख्य लढत ही भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असेल. राष्ट्रवादीकडून मधुकर कुकडे तर भाजपाकडून हेमंतकुमार पटले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपातून पुन्हा काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांच्याकडून आघाडीच्या उमेदवाराल जिंकवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे याठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार मुकाबला होण्याची शक्यता आहे. तर पालघरमध्ये भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मुलाला शिवसेनेने परस्पर उमेदवारी देऊ केली आहे. तर भाजपाने आयत्यावेळी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांना गळाला लावत शिवसेनेपुढे आव्हान निर्माण केले आहे.