भाजपा खासदार-आमदारामध्येच एकमत नाही; पडळकरांनी केली संजय पाटलांवरच टीका

Gopichand padalkar vs sanjay kaka patil

सांगली: सांगलीतील कोरोना परिस्थिती हाताळण्यावरून आता भाजपाच्याच आमदार-खासदारांमध्ये मतभिन्नता असून वाद निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. भाजपाच्या विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीच सांगलीचे भाजपा खासदार संजय काका पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. याआधी लोकसभेच्या निवडणुकीवेळी भाजपाकडून संजय पाटील, वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील हे उभे राहिले होते. निवडणुकांवेळी या तिघांनी एकमेकांवर केलेल्या खोचक टीकांमुळे निवडणुकांची धुमशान चांगलीच रंगली होती.

तर, खासदारकीच्या निवडणुकांमध्ये संजय पाटील यांनी बाजी मारली होती. यानंतर, भाजपाविरुद्धच निवडणुक लढवणाऱ्या आणि प्रचार करणाऱ्या पडळकरांना विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपात घेण्यात आले. विधानसभेत थेट अजित पवारांना आव्हान दिल्यानंतर त्यांचा दारुण पराभव झाला होता. तर, धनगर समाजाचा असलेला पाठिंबा बघता भाजपाने गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. पडळकर हे अनेकांवर केलेल्या टीकांमुळे सातत्याने चर्चेत असतात.

‘ऑपरेशन कमळ’ फसले; पुन्हा शिवसेनेचा सामनातून भाजपावर निशाणा

आता मात्र, स्वतःच्याच पक्षातील (भाजपा) खासदार संजय पाटील यांच्यावरच त्यांनी टीकास्त्र सोडल्यामुळे भाजपातील आमदार-खासदारांमध्ये बेबनाव असल्याचा समोर येत आहे. खासदार संजय पाटील यांनी सोमवारी (10 ऑगस्ट) जिल्हा प्रशासनावर जोरदार टीका करत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात जिल्हाधिकारी, आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक हे प्रमुख अधिकारी अपयशी ठरल्याने तातडीने त्यांची बदली करण्याची मागणी केली. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी केल्या.मात्र या वक्तव्याला भाजपचेच विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि विशाल पाटील यांनी विरोध करत अशा काळात अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी करणे चूक असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त दिले आहे.

यंदा दहीहंडी गोविंदांच्या थरांविनाच!

कोरोनाचा संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी अपयशी ठरल्याने तातडीने त्यांची बदली करण्याची मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून खासदार संजय पाटील यांनी केली आहे.तसेच सांगली जिल्यात कोविड-19 विषयक परिस्थितीचा अभ्यास, निरीक्षण आणि देखरेखीसाठी केंद्र सरकारच्या मार्फत पथक पाठवून येथील परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यासंदर्भात उपाययोजनांबाबत स्थानिक प्रशासनाला आदेश द्यावा अशी मागणीही केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

कोकणात गणेशोत्सवादरम्यान करणार २४ तास अखंडीत वीज पुरवठा: ऊर्जामंत्री नितीन राऊत

यावर प्रतिक्रिया देताना आमदार पडळकर यांनी खासदार पाटील यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत अधिकाऱ्यांवर टीका करण्याची ही वेळ नसल्याचं म्हटलं. “आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह सर्वच अधिकारी खूप चांगले काम करत आहेत. जिल्ह्याला चांगले अधिकारी मिळाले आहेत, माझा त्यांना पाठिंबा आहे. अधिकाऱ्यांवर टीका करण्याची ही वेळ नाही, ही वेळ बदली करण्याची नाही, असे करुन अधिकारी वर्गाचे खच्चीकरण करु नका. नवे अधिकारी आले तर परिस्थिती समजून घेण्यात त्यांचा वेळ जाईल. मी अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असे म्हणत पडळकर यांनी खासदार संजय पाटील चुकीची मागणी करत असल्याचे म्हटले. त्यामुळे आता सांगलीतील हा भाजपातील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून हे प्रकरण भाजपा नेते कसे हाताळणार हे महत्वाचे आहे.