fbpx

जेव्हा प्रतापराव चिखलीकर नारायण राणेंना म्हणतात “साहेब, सगळ्यांचा बदला घेतला”…

टीम महाराष्ट्र देशा : नांदेडमधील भाजपचे नवनिर्वाचित खासदार प्रतापराव चिखलीकर आणि माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांची भेट घेतली. ही भेट काही साधीसुधी नव्हती या भेटीत अनेक राजकीय गणिते होते.

जेव्हा खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी नारायण राणेंची भेट घेतली तेव्हा ते म्हणाले “साहेब, सगळ्यांचा बदला घेतला” त्यानंतर राणे म्हणाले, “वेल डन, अभिनंदन!”. हा संवाद सगळ काही सांगून जातो.

प्रतापराव चिखलीकर हे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडून आले असले तरी, त्यांचं मूळ काँग्रेसचं आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे ते खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. पण चिखलीकर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक मानले जातात. यापूर्वी अनेकदा चिखलीकर आणि चव्हाण यांच्यातला कलगीतुरा मराठवाड्याने पाहिला आहे.

नारायण राणे ज्यावेळी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री पदाचं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं. मात्र एका म्यानेत दोन तलवारी राहणे शक्य नव्हते. त्यातून नारायण राणे आणि अशोक चव्हाण यांचा राजकीय संघर्ष सुरु झाला. दोघांमधील अंतर्गत धुसपूस विविध कारणांनी समोर आली. अशोक चव्हाण राज्यातील काँग्रेसमधील वजनदार नेते असल्याने त्याचा नारायण राणे नेहमीच फटका बसला. यातून नारायण राणे आणि अशोक चव्हाण एकमेकांचे राजकीय शत्रू बनले. नारायण राणे आपल्या मनातील नाराजी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली आहे.