मोदी विरोधकांचे दाजी, ते तर निवडून येणारच : परेश रावल

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत सिद्ध न करता आल्याने कर्नाटकातील भाजपचे नेते येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान कर्नाटकातील मोठ्या राजकीय घडामोडीनंतर अखेर काल जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

या शपथविधीला देशभरातील अनेक विरोधीपक्षातील नेत्यांनी हजेरी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या. या शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी, सोनिया गांधी, मायावती, सिद्धरामय्या यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती.दरम्यान यावेळी विरोधकांकडून सरकारविरोधात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं.

यावर भाजपा खासदार परेश रावल यांनी एक ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधकांपैकी कोणाचाही उल्लेख न करता मेहुणी आणि भावोजी यांच्या नात्याचा संदर्भ देत परेश रावल यांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

परेश रावल यांनी ट्विटरवर एक स्क्रीनशॉट शेअर करत त्याखाली ‘देख तमाशा देख’ असं लिहिलं आहे. ‘भावोजींना अडवण्यासाठी मेहुणी ज्याप्रकारे दारावर उभी राहते, अगदी त्याचप्रकारे मोदींना रोखण्यासाठी विरोधक उभे आहेत. मेहुणीलाही माहित असतं की भावोजी तर येणारच आहेत,’ असं रावल यांनी ट्विट केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये म्हंटलं आहे.