शिवसैनिक हत्या प्रकरण: राष्ट्रवादी आमदारानंतर आता भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक

शिवाजी कर्डिले

अहमदनगर: केडगावचे शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे हत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केली आहे. आता जगताप यांचे सासरे आणि भाजप आमदार असणारे शिवाजी कर्डिले यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. कर्डिले यांच्यावर खुनाचा कट रचणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करण्याचा गुन्हा दाखल आहे.

शनिवारी 7 एप्रिल रोजी अहमदनगरमधल्या केडगाव प्रभाग क्रमांक 32 मध्ये पोटनिवडणुकीत पार पडली, मात्र याचवेळी शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची भरदिवसा रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप त्यांचे वडील आमदार अरुण जगताप, संग्राम यांचे सासरे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा संदीप कोतकरसह 50 जणांवर खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शनिवारी रात्री पोलिसांनी संग्राम जगताप यांना ताब्यात घेतले, मात्र एखद्या चित्रपटाच्या सीन प्रमाणे आमदार कर्डिले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एसपी ऑफिसमध्ये धुडगूस घालत जगताप यांना सोडवण्यासाठी एसपी ऑफिसची तोडफोड केली होती.