अभाविपच्या विरोधात दलित-आंबेडकरवादी संघटनांना उभे करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव

sabale

पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात दलित संघटनांना नक्षलवादी मदत करीत आहेत, असा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप खासदारांच्या बैठकीत खासदार अमर साबळे यांनी केला आहे. साबळे यांनी केलेल्या आरोपांमुळे एका नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी वेगवेगळ्या राज्यांतील पक्षाच्या खासदारांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. अशाच प्रकारे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील भाजपच्या खासदारांची बैठक पार पडली. उपस्थित सर्वच खासदारांनी राज्यापुढील तसेच त्यांच्या-त्यांच्या भागातील काही प्रश्न मांडले.
अमर साबळे यांनी मात्र नक्षलवादी व दलित संघटना हा विषय मांडल्याने सर्वच खासदार अवाक झाल्याचे समजते. आंबेडकरी चळवळीतील एका नेत्याचे नक्षलवाद्यांशी संबंध असून ते सातत्याने संघ व भाजपच्या विरोधात प्रचार करीत असल्याचे विधान त्यांनी केल्याचे कळते.

या संदर्भात खासदार अमर साबळे यांनी भाजप खासदारांच्या बैठकीत नक्षलवादी व दलित संघटनांचा विषय मांडल्याचे मान्य केले. पंतप्रधानांसमोर त्यांनी काय सांगितले याचीही सविस्तर माहिती त्यांनी दिली. आदिवासी भागात विकासकामे होत आहेत, परिणामी आदिवासी समाजातून नक्षलवादी चळवळीत होणारी भरती कमी झाली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांनी दलित समूहावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अभाविपच्या विरोधात दलित-आंबेडकरवादी संघटनांना उभे करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठातील एबीव्हीपीच्या विरोधातील आंदोलने ही त्याची उदाहरणे आहेत. रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर भाजप व संघाच्या विरोधात देशभर आंदोलने झाली; परंतु वेमुला दलित नसताना, तो दलित असल्याचे सांगून लोकांची माथी भडकावण्यात आली, असा आरोपही साबळे यांनी केला.
भारिप-बहुजन महासंघाचे नेते  प्रकाश आंबेडकर यांनी, साबळेंच्या आडून आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याचा हा भाजप व संघाचा कट आहे, असा प्रतिहल्ला चढविला आहे.