भाजप आमदाराची नवी घोषणा; ‘हम दो, हमारे १८’

जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रणाविषयी सर्वांना समान कायदा बनत नाही, तोपर्यंत हिंदू भावांनी थांबायचं नाही.

टीम महाराष्ट्र देशा- वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेण्यासाठी प्रसिद्ध असणारे भाजप आमदार विक्रम सैनी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. लोकसंख्या नियंत्रणाबद्दलच्या नियमांवर टीका करताना अजब घोषणा केली आहे. सैनी यांनी ‘हम दो, हमारे १८’, आणि ‘हम ५, हमारे २५’, अशी नवी घोषणा केली. या घोषणेमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

मुझफ्फरनगर येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या विक्रम सैनी यांनी हिंदूंनी लोकसंख्या वाढीसाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे असे सांगितले.मात्र हे सांगत असताना ‘हम दो, हमारे १८’, आणि ‘हम ५, हमारे २५’, अशी नवी घोषणाकेल्याने वाद ओढवून घेतला आहे.
नेमकं काय म्हणाले विक्रम सैनी

सरकारकडून ‘हम दो, हमारा एक’ अशी घोषणा करण्यात आल्यानंतर हिंदू समाजातील अनेक जण इथेच अडकले. परंतु, आता हम दो, हमारे १८, हम ५, हमारे २५ असं म्हणण्याची वेळ आली आहे. हा देश सर्वांसाठी समान असेल तर कायदाही सर्वांसाठी समान असायला हवा. जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रणाविषयी सर्वांना समान कायदा बनत नाही, तोपर्यंत हिंदू भावांनी थांबायचं नाही. कायदा बनेल तो सर्वांसाठी. तोपर्यंत थांबू नका. दोन मुलं झाल्यानंतर माझी पत्नी मला म्हणाली होती आता तिसरे नको. परंतु मी तिला म्हणालो अजून चार-पाच होणार आहेत.