#पक्षांतर : आता चक्क भाजपचाच आमदार शिवसेनेच्या गळाला ?

udhav Thackeray devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसारच भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाच लावला आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून नांदेडचे एकमेव भाजपचे आमदार तुषार राठोड आता शिवसेनेच्या गळाला लागल्यचा चर्चा आहेत.

दरम्यान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते. 2 ऑगस्ट रोजी सकाळी शासकीय विश्रामगृहात भाजपचे जिल्ह्यातील विधानसभेचे एकमेव आमदार असलेले डॉ. तुषार राठोड हे शासकीय विश्रामगृहात पोहोचले. विश्रामगृहात पोहोचून आमदार राठोड यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी तिथे माजी पालकमंत्री अर्जुन खोतकर, हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, देगलूर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे हेदेखील उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, विधानपरिषद सदस्य तथा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर ही मंडळीदेखील नांदेड शहरात राहतात. परंतु यापैकी कोणीही आदित्य ठाकरे यांच्या स्वागताला गेले नाही. एकटे आमदार राठोड आदित्य ठाकरेंना भेटायला गेले होते. त्यामुळे चर्चांना उधान आले आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील मुखेड हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. 2015 साली झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. तुषार राठोड हे 47 हजार 248 मतांनी विजयी झाले होते. आमदार तुषार राठोड यांनी काँग्रेसच्या हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांचा पराभव केला होता.