भाजप आमदार मुरकुटेंची मुजोरी, शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर हिसकावला मोबाईल

टीम महाराष्ट्र देशा : नेवासा मतदार संघातील भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटेंना शेतकऱ्यांनी पाटपाण्याचा प्रश्न विचारला असता आमदार मुरकुटेंची मुजोरी पाहायला मिळाली आहे. आमदार मुरकुटे यांची नेवासा तालुक्यात विकास दिंडी सुरु असताना शेतकरी पाटपाण्याची मागणी करत होते, आणि त्याचे मोबाईलवर चित्रीकरण देखील सुरु होते. आमदार मुरकुटे शेतकऱ्यांना एस, एस, एस, पाणी येईल असे बोलत होते. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या हातातील मोबाईल आमदार मुरकुटेंनी हिसकावला. आता या आमदार महाशयांच्या या मुजोरीचा व्हीडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला असून. त्यांचावर सर्वच स्थरातून टीकेची झोड उठली आहे.

२०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार होऊन बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासा तालुक्यात आमदारकी मिळवली. आ. मुरकुटे यांनी गेल्या ५ वर्षांपासून तालुक्यातील त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नेते शंकर गडाख यांच्या ताब्यातील मुळा कारखाना, मुळा शैक्षणिक संस्था, नेवासा बाजार समिती, शनैश्वर देवस्थान, मुळा बँकेसह विविध संस्था आ. मुरकुटे यांनी रडारवर घेतल्या. शासन पातळीवर विविध तक्रारी करत गडाख यांच्या ’मुळा’वरच घाव घातला. यात आ. मुरकुटे यांना यश मिळाले असले, तरी नेवासा तालुक्यातील रस्ते, वीज, पाटपाणी या प्रश्नात त्यांना यश मिळाले नाही. आणि यातूनच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये संताप उफाळून येऊन लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारू जाऊ लागले आहेत. मात्र जनतेने प्रश्न विचारताच आमदार महाशांना आपले रंग दाखवत शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावून घेतला आहे.

अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुक असल्याने मुरकुटे यांचा हा प्रताप समोर आला आहे. त्यामुळे आता विरोधकांना आयते कोलीत मिळाले असून आ.बाळासाहेब मुरकुटे यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे.

तर दुसरीकडे माजी आ. शंकरराव गडाख यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात पाटपाण्यासाठी उत्तरेतील तीन कॅबिनेट मंत्र्यांशी जाहीर पंगा घेतला होता. आता ते कुठल्याही राष्ट्रीय पक्षात नसल्याने त्यांना कुठल्याही मोठ्या राजकीय नेत्याचा पाठिंबा मिळत नाही. त्यामुळे गडाख हे एकटे पडले आहेत. ते दुसर्या कुठल्या पक्षात प्रवेश करणार नसून क्रांतिकारी शेतकरी पक्षातूनच निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे गडाख कसे अडचणीत येतील, यासाठी मोठे नेते प्रयत्न करत आहेत. आ. मुरकुटे यांना अगदी काँग्रेस, राष्ट्रवादीकडून अंधारात मदत होत आहे. आता या विधानसभा निवडणुकीत मुरकुटेंना त्यांच्या या करामतीचा किती फटका बसतो हे विधानसभेच्या निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या