fbpx

शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करा; भाजप आमदार अनिल गोटे यांची मागणी

मुद्रांक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांचा हात असल्याचा अनिल गोटे यांचा आरोप

टीम महाराष्ट्रा देशा: मुद्रांक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगी याने नार्को टेस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले आहे, त्यामुळे या प्रकरणात शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी लवकरच न्यायालयात जाणार असल्याची माहिती भाजप आमदार अनिल गोटे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज मोरे आणि भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. शुक्रवारी त्यांनी एकमेकांना आव्हान देत पत्रकार परिषद घेतली. या वेळी आमदार गोटे म्हणाले की, तेलगीच्या पुराव्यामध्ये शरद पवार यांचे नाव २१ वेळा घेण्यात आले आहे. छगन भुजबळ यांचाही त्यात समावेश आहे. तेलगी याने समीर भुजबळ व इंधनचा काळाबाजार करणारे गिरीष चढ्ढा यांचेही नाव घेतले होते. तेलगीने स्मारकासाठी देणगी दिल्यामुळे त्यांचे नाव कोनशिलेवर घेतले. त्याच्याशी मैत्री असल्यामुळेच मला विनाकारण मुद्रांक घोटाळ्यात गोवण्यात आले. कारागृहात असतांना मला राम जेठमलानी भेटण्यासाठी आले होते. त्यांनी सांगितले म्हणून शरद पवारांना वाचविले. परंतु आता शरद पवार यांचे नाव मुद्रांक घोटाळ्यात वर्ग करावे म्हणून न्यायालयात जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.